Wednesday, August 24, 2011



“शिवरायांच्या पद्स्पर्शाने पवित्र झाली शिरवळ भूमी,
किल्ले सुभानमंगल देई स्फूर्ति,बुरुजावरती तोफा झड़ती”


शिवरायांनी सुभानमंगल किल्ल्यावर स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ रोवली.या ठिकाणी घडलेला पहिला यशस्वी रणसंग्राम म्हणजे शिवचरित्रातील सोनेरी पान.

इ.स.१६४५ मध्ये शिवरायांनी तोरणा, राजगडासारखे मावळातले अनेक किल्ले ताब्यात घेतले.त्यावेळी मावळ प्रदेशावर आदिलशाहाच्या मिया रहीम महम्मद याचा अंमल होता.तो शिरवळच्या सुभानमंगल या भुईकोट किल्ल्यात रहात असे.त्याला अमिन असे संबोधले जाई.हिरडस मावळ, रोहिडे खोरे आणि शिरवळ खोर्‍यातील करवसूली तो करत असे. शिवरायांनी अनेक दुर्लक्षित किल्ले घेतले हे त्याच्या लक्षात आले नाही.परंतु,कराच्या वसूलीची रक्कम शिरवळला पोहोच करणारे देशमुख-देशपांडे त्या बाजूला फिरकलेच नाहीत.तेव्हा त्याला महाराजांचा उद्योग कळाला.त्याने विजापूरला ताबडतोब पत्र लिहून ही गोष्ट आदिलशाहास कळवली.

हा काळ धामधुमीचा होता.शहाजीराजे आदिलशाहाच्या अटकेत होते.छोट्या हिंदवी स्वराज्यावर फत्तेखान चाल करून आला होता. शिवरायांनी कावजी मल्हार खासनीस याच्यावर शिरवळची मोहीम सोपवली.तुळजाभवानीचे भक्त, मर्दमावळे स्वराज्यावर आलेल्या संकटांशी लढायला सज्ज झाले.इकडे बाळाजी हैबतरावसुद्धा लढाईला सिद्ध होता.किल्ल्याचा दरवाजा बंद करून त्याने तटावर आपल्या सैन्याची जय्यत तयारी ठेवली होती.कावजी खासनीस, गोदाजी जगताप, भीमाजी वाघ या वीरांनी पाच-सहाशे मर्द सवंगड्यांसह ८ ऑगस्ट १६४८ या दिवशी सायंकाळी सुभानमंगल किल्ल्यावर हल्ला चढ़वला.महाराजांच्या जबरदस्त प्रेरणेने मराठी सैन्याचा आवेश शत्रुच्या मनात थरकाप निर्माण करणारा होता.किल्ल्यामध्ये आदिलशाही सैन्य हजारोंच्या संख्येत होते.इकडे मावळे फक्त पाच-सहाशे.परंतु, त्यांचा आवेश इतका भयप्रद होता की त्यामुळे आदिलशाही सैन्य हादरले. आदिलशाही सैन्याचा प्रमुख बाळाजी हैबतराव हा कसलेला योद्धा किल्ल्यामध्ये उपस्थित होता.

आदिलशाही सैन्याने मावळयांवर किल्ल्यातून पेटते बाण, अवजड शस्त्रास्त्रे आणि दगड-गोटयाचा तूफान मारा केला.सैन्यावर उकळते तेल ओतन्यात आले.परंतु मावळे जराही डगमगले नाहीत.’हर हर महादेव’चा जयघोष वाढला. मावळयांनी पराक्रमाची शर्थ केली आणि ते भुईकोट किल्ल्याच्या तटावरुन उड्या मारून किल्ल्यात घुसले.कावजीने किल्ल्याचा तट फोडून आत प्रवेश केला.किल्ल्याचे दरवाजे उघडण्यात आले.तूफान लढाई झाली.मराठयांचा जोर जबरदस्त होता.युद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये पहिल्याच फटकयात इंगळयाने पंचवीस, पोळने बारा, चोराने चौदा, घाटग्याने तेवीस, वाघाने सोळा आणि कावजीने एकोणवीस उत्तम योद्धे ठार केले.मराठयांचा जोर पाहून आदिलशाहाचे सैन्य पळत सुटले.मुठभर मावळयांनी हजारो आदिलशाही सैन्यावर विजय मिळविला.कावजीने भाल्याचा वार करून बाळाजी हैबतरावला कापून काढले.गोदाजी जगताप, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भीमाजी वाघ, भैरुजी चोर या मावळयांनी शर्थीची झुंज दिली.आदिलशाही सैन्य शरण आले.सुभानमंगल किल्ल्यावरील आदिलशाही चाँदतारा उतरला आणि हिंदवी स्वराज्याला परमपवित्र भगवा ध्वज फडकू लागला.अशारीतीने शिवरायांनी स्वराज्यासाठी लढलेल्या पहिल्या लढाईचा विजय साकार झाला.

८ ऑगस्ट यादिवशी शिवाजी महाराजांच्या पहिल्या लष्करी विजयाचा स्मृतिदिन प्रतिवर्षी शिरवळच्या पावनभूमीमध्ये साजरा करण्यात येतो.सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव प्रेरणादायी स्वरूपात संपन्न व्हावा आणि राष्ट्रजागृतीची नवी पहाट उदयाला यावी ही सर्व शिवप्रेमीना नम्र विनंती।






<<मागे